Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

आजारावर घरगुती उपाय ५ प्रमुख वनस्पतींचे औषधी चमत्कार

ayurvedic-medicinal-plants

१. कडूनिंब

हे झाड सर्वत्र दिसते आणि सर्वांना परिचित आहे. पाने, फळे व खोड हे सर्व औषधी आहेत. त्वचेवरील विविध विकारांवर पानांचा वापर केला जातो. पानांपासून तयार केलेले तेल खाज कमी करते व जखमा भरून येण्यास मदत करते. पानांचा उकळून काढा करूनसुद्धा सेवन करता येतो. कडूनिंब हे एक उत्कृष्ट जंतुनाशक व कीटकनाशक आहे. खोडाच्या सालीपासून तयार काढाही अनेक रोगांवर परिणामकारक ठरतो.

कडूनिंब तेल तयार करण्याची पद्धत

कडूनिंबाच्या पानांचा पाणी घालून १०० मि.ली. रस काढावा. त्यात २५ मि.ली. तिळाचे तेल घालून मंद आचेवर झाकण ठेवून उकळावे. साधारण अर्ध्या तासात पाणी आटून उरलेले तेल गाळून बाटलीत साठवावे. हे तेल वर्षभर टिकते. जखमेवर लावल्यास लवकर बरं होतं.

बाळंतपणातल्या जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी कडूनिंबाची पाने घालून गरम पाण्याच्या टबमध्ये रोज १५ मिनिटे बसावे.

२. तुळस

तुळस लहान असली तरी तिचे गुण महान आहेत. तुळशीची पाने सर्दी-खोकल्यावर विशेष परिणामकारक असतात. पानांचा रस मधात मिसळून किंवा काढा करून घेतल्यास खोकल्यावर आराम मिळतो. पाने उष्ण असल्याने कफदोष कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात.

तुळशीच्या बिया मात्र थंडावा देणाऱ्या असतात. म्हणून पित्तदोष, जळजळ, पायांची आग, तोंड येणे, नाकातून रक्त येणे, रक्ती मूळव्याध अशा विकारांवर घेतल्या जातात. या बिया दूध किंवा तुपाबरोबर घेतल्यास जास्त गुणकारी होतात. साधारण २० ते ३० बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून एका वेळी घ्याव्यात. दिवसातून ३ ते ४ वेळा हे सेवन करावे.

सर्दी व तापासाठी तुळशीचा रस

१ कप तुळशीची पाने ५ मिनिटे पाण्यात भिजवून वाटावीत व कापडातून गाळावीत. यापासून साधारण २० मि.ली. म्हणजे अर्धा कप रस मिळतो. मोठ्या व्यक्तींनी हा डोस सकाळी व संध्याकाळी ३ दिवस घ्यावा.

३. कोरफड (कुमारी)

ही वनस्पती जखमांवर पट्टीसारखी वापरता येते. जखमेच्या आकाराचा तुकडा कापून ओली बाजू जखमेवर ठेवून पट्टी बांधावी. दररोज पट्टी बदलल्यास जखमा लवकर भरतात. भाजल्यावरच्या जखमांवरही उपयोगी आहे. कोरफड अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. यकृत विकार, स्त्रियांचे आजार व खोकला यावर गुणकारी आहे.

आपण हे वाचत आहात dharmashiksha. com वर

४. अडुळसा

या झुडुपाची पाने खोकल्यावर औषधासारखी वापरतात. पानांचा रस मधाबरोबर किंवा काढा करून दिला जातो.

काढा तयार करण्याची पद्धत

अडुळशाची ५०-६० पाने धुऊन १ लिटर पाण्यात अर्धा तास मंद आचेवर उकळावीत. पाणी आटून साधारण पाव लिटर उरले पाहिजे. हे गाळून ठेवावे. खोकला झाल्यास २० मि.ली. काढा दिवसातून २ ते ३ वेळा, सलग ३ दिवस द्यावा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयोगी ठरतो.

५. कुडा

हे झाड जंगलात दिसते. याची शेंगेसारखी फळे पिकल्यावर काळी होतात व जोडीने लटकतात. खोडाचे साल औषधी असते. जुलाब आणि आव यावर ते वापरले जाते.

कुड्याचा काढा

१६ कप पाण्यात १ कप साल कुटून उकळावे. मिश्रण ४ कप शिल्लक राहिल्यावर गार करून बाटलीत भरावे. यातील २० मि.ली. काढा दिवसातून ३ वेळा द्यावा.